चाळीसगाव प्रतिनिधी । खासदार ए.टी. पाटील यांचे शालक तसेच अन्य आप्तांनी भाजपला जय श्रीराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खासदार ए. टी. पाटील यांना पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर प्रचंड घडामोडी झाल्या. आमदार स्मिताताई वाघ यांना औटघटकेसाठी तिकिट देण्यात आले. तर ऐन वेळेस त्यांचा पत्ता कट करून आमदार उन्मेष पाटील यांना तिकिट देण्यात आले. या सर्व घटनाक्रमात आधी ए.टी. पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारात नाना उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र नानांनी उन्मेष पाटील हेदेखील आपल्याला हटविण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात सहभागी असल्याचा आरोप करून त्यांचा प्रचार करण्यास साफ नकार दिला. यानंतर ए.टी. पाटील हे स्वस्थ बसून आहेत. मात्र आता निवडणुकीचा प्रचार ऐन शिखरावर पोहचत असतांना नानांच्या समर्थकांनी हालचाली सुरू केल्याचे दिसून येत असून याचा प्रारंभ चाळीसगावातून झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथे ए.टी. पाटील यांची सासुरवाडी आहे. त्यांचे शालक संजय चिंतामण आमले हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी नुकताच स्वत:सह आपले सहकारी अशोक आमले, रितेश आमले, रमेश सूर्यवंशी, संदीप आमले, किशोर शेवरे, बाळू आमले, हिलाल अहिररराव आणि बाळू मोरे यांच्यासह भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार राजीव देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. ऐन निर्णायक टप्प्यात खासदार ए.टी. पाटील यांच्या आप्तांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या संदर्भात भाजप नेमके काय डॅमेज कंट्रोल करणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. तर राजकीय अभ्यासकांच्या मते नानांचे समर्थक हे आता प्रचंड गतीने सक्रीय होण्याची शक्यता आहे.