धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात सध्या भीषण पाणी टंचाई सुरू असून यासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करून नागरिकांना नियमीत शुध्द पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी शिवसेना-उबाठा पक्षाने आज धरणगाव नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, धरणगाव शहरामध्ये सध्या अतिशय तीव्र पाणी टंचाई असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या अनुषंगाने आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी नगरपालिका गाठली. येथे मुख्याधिकारी नसल्याने या पदाधिकार्यांनी ठिय्या मांडून रोष व्यक्त केला आहे. याप्रसंगी पक्षाच्या वतीने मुख्याधिकार्यांच्या नावे एक निवेदन जारी करण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, दिनांक २८ मे रोजी शहरातील जैन गल्ली येथे नवीन पाईप बसवून पाणी पुरवठा करण्यात आला होता. यात थेट व्हाईट हाऊस पासून ते जैन गल्लीपर्यंत आणि परिसरात ज्यांनी नळ घेतलेले आहेत त्यांना व्यवस्थित पाणी येत नव्हते. ज्यांना थोडेफार पाणी आले ते देखील व्कमी दाबाने आले. याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या भागात नवीन नळ कनेक्शन घेण्यात आले आहे, त्या भागात पाणी पुरवठ्याच्या दिवशी ठेकेदाराचे कर्मचारी नसतात. यासोबत, शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा हा फिल्टर न करता करण्यात येत असल्यामुळे शहरात डेंग्यू, ताप आदी साथीचे आजार पसरलेले आहेत. शहरात होणारा पाणी पुरवठा हा अशुध्द प्रकारातील असून याकडे लक्ष देऊन शुध्द पाणी पुरवठा आणि तो देखील सुरळीतपणे करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान, या ठिय्या आंदोलनात शिवसेना-उबाठा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगरसेवक भागवत चौधरी आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.