जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील प्रत्येक ऊस कामगाराची नोंदणी करीत त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. ऊस तोड कामगारांसाठी गठित जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न, समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस तोड कामगारांसाठी गठित जिल्हास्तरीय समितीची सभा नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, राज्य शासनाने सर्व ऊसतोड कामगार यांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्त्यव्याला आहेत व ते सतत मागील 3 वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करीत असतील त्यांना संबंधित ग्रामसेवकाने सर्वेक्षण करून ओळखपत्र देणे अपेक्षित आहे. सदरचे काम वेळेत पूर्ण व्हावे, सुलभता यावी तसेच स्थानिक पातळीवर काही समस्या उद्भवल्यास त्याचे तातडीने निराकरण व्हावे म्हणून समिती गठित करण्यात आली आहे. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) यांनी सर्व ग्रामपंचायतीकडुन तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी कार्यान्वित साखर कारखान्याकडून ऊसतोड कामगारांची माहिती तात्काळ उपलब्ध करुन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे सादर करावी, असेही निर्देश दिले. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पाटील यांनी ऊस तोड कामगारांसाठी सुरू केलेल्या नोंदणी विषयी व समितीच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती बैठकीत दिली.