ऊस उत्पादकांच्या पूर्व हंगामी ठेवी परत मिळाव्या : राकेश फेगडेंसह शेतकर्‍यांची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बिलातून कापून पूर्व हंगामी ठेवी स्वरूपात घेतलेल्यार रकमा मिळाव्यात अशी मागणी राकेश फेगडे यांच्यासह ऊस उत्पादकांनी केली आहे.

कोरपावली येथील राकेश वसंत फेगडे यांच्यासह परिसरातील उस उत्पादकांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, आम्ही आपल्या मधुकर सहकारी साखर कारखान्यास सतत ऊस पुरवठा करणारे ऊस उत्पादक आहोत. महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या सन २०१०-११ च्या गाळप हंगामाचा आढावा व गाळप हंगाम २०११-१२ सुरु करण्याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मा.मुख्यमंत्री महोदय यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १८ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तातील विषय क्रमांक १०- ऊस बिलातुन पुर्वहंगामी खर्चासाठी ठेवीसाठी तरतूद करणे या विषयावरील संमत ठरावानुसार रु. ५०/- प्रती टन कपात करुन परतीस पात्र ठेवी उभारण्यात याव्यात असे ठरविण्यात आले होते.

मंत्री समितीच्या निर्णयानुसार मधुकर सहकारी साखर कारखाना. लि. च्या वार्षिक सर्व साधारण सभेत पुर्वहंगामी खर्चासाठी रु. ५०/- प्रती टन कपात करुन परतीस पात्र ठेवी उभारण्यात याव्यात असा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार सन २०११-१२ या आर्थिक वर्षा पासून आपल्या कारखान्याने आमच्या उस पुरवठा बिलातुन रु ५०/- प्रती टनाप्रमाणे परतीस पात्र पुर्वहंगामी ठेव म्हणुन कपात केलेली आहे. संबंधीत ठेवी ह्या परतीस पात्र असून कारखान्याकडे जमा आहेत. कारखान्याचे ऊस गाळप बंद असुन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना सिक्युरटायझेशन कायद्यानुसार ताब्यात घेतलेला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना विक्रीसाठी जाहिरात प्रसिध्द केलेली असून भविष्यात मधुकर सहकारी साखर कारखाना सुरु होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे उभारलेल्या ठेवींची पूर्व हंगामी खर्चासाठी वापराची आवश्यकता नाही.

यामुळे आज पावेतो ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातुन कपात केलेल्या पुर्व हंगामी ठेवींची रक्कम ऊस उत्पादकांना व्याजसह परत मिळणेस पात्र असल्याने आपण उपयोजना करून ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातुन कपात केलेल्या ठेवी व्याजासह त्वरित परत कराव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. यावर राकेश फेगडे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

Protected Content