दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्यांवर आरबीआयने तात्काळ कारवाईची मागणी

यावल प्रतिनिधी । भारतीय चलन पद्धतीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) वेगवेगळ्या प्रसंगी १४ प्रकारची १० रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. मात्र, ही नाणी वैध असूनही समाजात पसरलेल्या अफवासह गैरसमजांमुळे अनेक लोक नाणी घेण्याचे नाकारतात. याबाबत आरबीबायने तात्काळ कारवाई करा, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती कडून करण्यात आली आहे.

दरम्यान, आजपर्यंत रिझर्व बँकेने वर्ष २००९ मध्ये आणि २०१० मध्ये प्रत्येकी २ वेळा, वर्ष २०११, २०१२, २०१३, २०१४ मध्ये प्रत्येकी १ वेळा, तसेच वर्ष २०१५, २०१६ आणि २०१७ मध्ये प्रत्येकी २ वेळा १० रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. एकूणच आत्तापर्यंत १४ वेळा चलनात आणलेली ही सर्व १० रुपयांची नाणी ही वैध असल्याचे जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली असुन, याबाबत भारतीय रिझर्व बँकेने प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळवले आहे.

प्रत्यक्षात मात्र १० रुपयांची सर्व नाणी वैध असूनही समाजात पसरलेल्या अफवा / गैरसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी १० रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात. नागरिकांना याविषयी स्पष्टता नसल्याने त्यांच्याकडे १० रुपयांची नोट देण्याशिवाय अन्य पर्याय उरत नाही. तसेच त्यांच्याकडे केवळ नाणी असल्यास त्यांच्या खरेदी करण्यावर बंधने येतात आणि त्यांची गैरसोय आणि त्यांना मनस्ताप होतो.

१७ जानेवारी २०१८ या दिवशी भारतीय रिझर्व बँकेने ही नाणी स्विकारण्याच्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून लोकांना त्याबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अनेक लोक ही नाणी नाकारून नागरिकांची गैरसोय करत आहेत. प्रत्यक्षात, १० रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार देणार्‍या व्यक्तिंविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल, असे निर्देशही भारतीय रिझर्व बँकेने दिले आहेत. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार करून संबंधित दुकानदार, विक्रेते यांच्याविरुद्ध तक्रार केल्यास शिक्षेचे प्रावधानही आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय रीजर्व बँकेने १० रुपयांची नाणी स्विकारण्याबाबत जे आदेश दिले आहेत, ते सर्व दुकानदार, विक्रेते यांच्यापर्यंत पोहचतील आणि त्यांच्याकडून कोणत्याही नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्वरित आदेश काढण्यात यावेत आणि १० रुपयांची नाणी घेण्यास नकार देणार्‍या सर्व दुकानदार, विक्रेते यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, हे त्या आदेशात स्पष्टपणे नमूद करावे.

या सोबत नागरिकांचे जे अधिकार आहेत, त्याविषयी सर्व नागरिकांत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, स्थानिक केबल नेटवर्क, होर्डिंग, प्रसिद्धीपत्रक इत्यादी माध्यमांतून व्यापक प्रमाणांत प्रसिद्धी करावी अशी मागणी ‘सुराज्य अभियान’च्या वतीने जळगाव येथे निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देऊन केली गेली. नागरिक त्यांच्या अधिकारापासून वंचित राहू नयेत, तसेच त्यांची गैरसोय अथवा अडवणूक होऊ नये यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी, अशी विनंती सुद्धा सदर निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी जळगाव येथे धर्मप्रेमी सर्वश्री राहुल घुगे हिंदू जनजागृती समितीचे दुर्गाप्रसाद पाटील, उमेश जोशी आणि प्रशांत जुवेकर उपस्थित होते.

 

Protected Content