रावेर-शालीक महाजन । रावेर विधानसभा मतदारसंघात सोशल इंजिनिअरिंग, धार्मिक एकत्रीकरण, आणि लाडक्या बहिणींच्या एकजुटीमुळे नवनिर्वाचित आ.अमोल हरीभाऊ जावळे यांची नैय्या विधानसभेत पार झाली आहे. सुरुवातीला अतिशय चुरशीची वाटणारी निवडणूक शेवटी एकतर्फी लागली. काँग्रेसचे आ. शिरीष चौधरी यांच्या विरोधात जनतेत रोष होता, म्हणून जनतेने त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांच्या विरोधात मतदान करून त्यांना नाकारल्याचे काही राजकीय जाणकार सांगतात. रावेर विधानसभेत सर्वात महत्वाचे फॅक्टर म्हणजे जामनेर येथील अरविंद देशमुख नावाची सर्वाधिक चर्चा आहे.
काँग्रेसचे माजी आ. शिरीष चौधरी यांनी तब्येतीचे कारण देत त्यांचा मुलगा धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाकडून स्व. हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल हरीभाऊ जावळे यांना उमेदवारी देण्यात आली. मतदारसंघाची सामाजिक स्थिती बघता, भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी अनुकूल मतदारसंघ आहे. भाजपाने आमोल जावळे यांना उमेदवारी दिल्यावर, मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अरविंद देशमुख यांना रावेर मतदारसंघात सक्रिय केले. त्यांनी पक्षाचे पूर्ण संघटन कामाला लावले होते आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रणनीती आखली होती. सोबतच, आरएसएसने धार्मिक एकत्रीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला. तर मतदारसंघातील सुमारे ४५ हजारांच्या वर असलेला मराठा समाज आपल्या बाजूने वळविण्यासाठी आमोल जावळे यांनी रावेर शहरातील प्रसिद्ध व्यक्तीकडे जबाबदारी दिली होती.सर्वांनी वेगवेगळ्या रणनितीवर काम केल्यामुळे भाजपाला रावेर मतदारसंघात ४३,५६२ च्या लीडने विजयी होण्यास मदत झाली.
भाजपचे तालुका संघटन होते ‘ग्राउंडवर’
या निवडणुकीत पहिल्या फॅक्टरमध्ये शासनाच्या योजना आणि मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी रणनीती आखण्यात आली. गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुक्यात पक्षाचे विचार आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली. यात भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपा तालुकाध्यक्ष महेश चौधरी, उमाकांत महाजन (रसलपूर), प्रल्हाद पाटील (मोरगाव), सुनिल पाटील (वाघोड), आणि पद्माकर महाजन (रावेर) सि एस पाटील यांच्या कुशल रणनितीमुळे भाजपाने आपली टीम ग्राऊंडवर सक्रिय केली आणि त्याच रूपांतरण भाजपा उमेदवार अमोल जावळे यांच्या विजेश्री खेचून आणण्यात झाले.
भाजपाच्या बाजूने फिरले वातावरण !
दुसऱ्या फॅक्टरची जबाबदारी आ. अमोल जावळे यांनी रावेर शहरातील एक नामवंत व्यक्तीकडे मराठा समाज भाजपाकडे वळविण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली त्यांनी समाजात नकोसे पुढाऱ्यांना बायपास करून नव्या दुसऱ्या फळीतील लोकांपर्यंत थेट पोहचले. याचा परिणाम मतदानात झाला.दुसऱ्या बाजूने व्यायाम शाळांच्या माध्यमातून कमी वेळेत युवकांपर्यंत अमोल जावळे यांना पोहचविण्यात यशस्वी झाले.भाजपाच्या बाजूने वातावरण तयार करून अमोल जावळे यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले.मागच्या वेळी काँग्रेस लीड असलेल्या रावेर पूर्व भागात यावेळेस भाजपाला मोठी लीड मिळाली.शहरात देखील भाजपा साडेपाच हजारांनी पुढे होती.
लाडक्या बहिणींचे मतदान मतपेटीत पडण्यावर मोठी भर
तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आरएसएसने बजावला. अमोल जावळे यांच्या माध्यमातून भाजपाला मतदान करण्यासाठी आरएसएस मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला होता. काँग्रेसकडूनही ही जागा कोणत्याही स्थितीत आपल्या कडे वळवण्यासाठी योजना आखण्यात आल्या. यात लाडक्या बहिणींचे मते मतपेटीत टाकण्यासाठी जनजागृती करण्यात आली. धार्मिक एकत्रीकरण करण्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. यामध्ये मागच्या पंचवार्षिकच्या तुलनेत चार टक्के मतदान अधिक झाले आणि त्याचा फायदा थेट भाजपाला झाला. स्व. हरीभाऊ जावळे यांच्या २०१९ मध्ये झालेल्या पराभवातून आ. अमोल जावळे यांनी बरेच काही शिकले होते. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत श्री. जावळे यांनी काही निर्णय स्वतःच घेतले होते आणि याची खूप प्रशंसा मतदारसंघात होत आहे.