बिकट स्थितीत संघटन वाढविण्याचे आ. शिरीष चौधरींसमोर आव्हान

रावेर शालीक महाजन । काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने आ. शिरीषदादा चौधरी यांचे राजकीय वजन निश्‍चीत वाढले आहे. तथापि, अत्यंत बिकट परिस्थीतीत पक्षाला बळकटी देण्याचे आव्हान देखील त्यांच्यासमोर असणार आहे.

आज काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्या सारख्या अतिशय आक्रमक नेत्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला राज्यात कॉग्रेस पक्षाचे संघटन मजूबत करण्यासाठी कार्यकारिणीचे गठन करण्यात आले आहे. यात आमदार शिरीष चौधरी (mla shirish chaudhari) यांची कॉग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष पदाची धुरा देऊन जळगाव जिल्ह्यात कॉग्रेसला संजीवनी देण्याची मोठी जबाबदारी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये कॉग्रेसची घसरगुंडी थांबवण्याची जबाबदारी आता आमदार शिरीष चौधरी यांच्यावर असणार आहे. राज्यात कॉग्रेस पक्ष सत्तेत असून देखिल काँग्रेसला फारसे संघटन मजबूत करता आले नाही. त्यामुळे राजकीयदृष्ट्या आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातुन जास्तीत-जास्त कॉग्रेस पक्षाच्या जागा निवडणून आणण्याची मोठी जबाबदारी आता आमदार चौधरींकडे असेल. यासाठी त्यांना मंत्रीपदाची जोड आवश्यक होती. परंतु त्यांना ती मिळाली नाही. याची भर आता उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून भरून काढल्याचे मानले जात आहे.

मागील २०१९च्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यात काँग्रेसला फारसे यश लाभले नाही. एकेकाळी एकहाती सत्तेत गाजवणार्‍या काँग्रेसला दारुण पराभव स्विकारावा लागला होता. आता नशिबाने कॉग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातुन सत्तेत आहे. जिल्हाच्या दृष्टिने राजकीयदृष्टया कॉग्रेसला संघटन मजबूत करण्याची ही नामी संधी आहे.आमदार शिरीष चौधरी यांच्या होम ग्राउंड मध्ये म्हणजेच रावेरमध्ये सद्या स्थिती पंचायत समिती,बाजार समिती तसेच जिल्हा परीषदेचे बरेच सदस्य भाजपाचे आहेत.

यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे असून आमदार शिरीष चौधरी खास रणनितीवर काम करताय याकडे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. जळगाव जिल्हात भाजपाची स्थिती चांगली असून महाविकास आघाडीच्या माध्यमातुन सत्तेत असलेली राष्ट्रवादी व शिवसेनेने देखील आपला जनादेश वाढविण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. शिवसेनेकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील सारखे मातब्बर नेते असून राष्ट्रवादीने देखिल माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सारख्या अनुभवी नेत्याला पक्षात घेऊन आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी काँग्रेसने उशिरा का होईना त्या दिशेने पाऊल टाकत शिरीष चौधरी यांच्या पाठीशी ताकद उभी केल्याचे दिसत आहे.

संघटन मजबूत हेच ध्येय

या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना आमदार शिरीषदादा म्हणाले की, मला फक्त जिल्हात कॉग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करणे हेच माझ ध्येय आहे. आगामी येणार्‍या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगले यश मिळेल असा आत्मविश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मतदारसंघात कॉग्रेसची स्थिती

आमदार शिरीष चौधरी यांच्या रावेर व यावल होम ग्राउंड वर दोन्ही तालुक्यात कॉग्रेसची स्थिती फारशी समाधान कारक नाही. मागील निवडणुकीची आकडेवारी प्रमाणे यावल तालुक्यात कॉग्रेस पक्षाचे दोन जिल्हा परीषद सदस्य असून चार पंचायत समिती सदस्य आहेत. तर नऊ नगर सेवक आहेत. फैजपुर नगर पालिकेत चार नगर सेवक कॉग्रेसचे आहे. तर रावेर तालुक्यात एक जिल्हा परीषद सदस्य असून एक पंचायत समिती सदस्य आहे.परंतु आता पुला खालून बरेच पाणी वाहून गेले असून आमदार शिरीष चौधरी सत्तेत असून देखिल कॉँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी त्यांच्या पाठीशी ताकद अभी करत आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला अच्छे दिन येतात का हा येणारा काळच ठवणार आहे.

Protected Content