‘त्या’ चार भावंडांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

शेअर करा !

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील बोरखेडा येथील कुर्‍हाडीने वार करून हत्या करण्यात आलेल्या चारही भावंडांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात दफनविधीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील सविता मैताब भिलाला, राहूल भिलाला, अनिल भिलाला आणि सुमन भिलाला या चारही भावंडांची कुर्‍हाडीने वार करून अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आल्याचे काल सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत पाच संशयितांना ताब्यात घेतले. यातील तिघांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली असून त्यांच्याकडून या प्रकरणाची माहिती पोलीसांनी जाणून घेतली आहे.

दरम्यान, यातील मोठ्या मुलीवर अत्याचार झाल्याचे दिसून आल्याने तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून उर्वरित तिन्ही भावंडांचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर या चौघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या चारही भावंडांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना शोक अनावर झाल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. जिल्हा रूग्णालयाच्या शववाहिकेतून या चारही भावंडांचे मृतदेह आणण्यात आले. यानंतर त्यांच्या पार्थिवांवर आदिवासी परंपरेनुसार दफनविधीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरिक्षक आदींसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. लोकसंघर्ष मोर्च्याच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे या काल सकाळपासूनच पिडीत कुटुंबाला धीर देत आहेत. आज अंत्यसंस्काराला त्यांची देखील उपस्थिती होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!