पारोळ्यात रस्तालूट : पिग्मी एजंटकडून ५० हजारांची रोकड लंपास

robbary clipart

पारोळा, प्रतिनिधी | शहरातील अमळनेर रस्त्यावर अज्ञात लोकांनी एका पिग्मी एजंटवर हल्ला करून ४५ ते ५० हजारांची लूट केल्याची घटना काल (दि.१७) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.

 

अधिक माहिती अशी की, शहरातील धरणगाव अर्बन बँकेच्या शाखेतील पिग्मी एजंट सुभाष बुधा सोनवणे (वय ३०) याच्यावर तिघा अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत ४५ ते ५० हजारांची लूट केली. सदर एजंटला गंभीर जखमी केले आहे. सुभाष सोनवणे सायंकाळी ६.०० वाजेपासून डेली कलेक्शन करत होते, रात्री ८.३०ला ते कलेक्शन करून अमळनेर रस्त्यावरील बालाजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या आपल्या घरी सायकलीवर परत येत असताना तीन अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून सुभाष यांचेवर अचानक हल्ला केला. लोखंडी रॉड व लोखंडी टॅमीने डोक्यावर जोरदार हल्ला करत त्याच्या हातातील बॅग हिसकावून ते फरार झाले. सदर बॅगेत सुमारे ४५ ते ५० हजाराची रोकड असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर सोनावणे यांना जखमी अवस्थेत परिसरातील नागरिकांनी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचेवर डॉ. योगेश साळुंखे, यांनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्याचा सल्ला दिला आले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. घटनेची माहिती मिळताच पो.नि. लीलाधर कानडे व पथकाने घटनास्थळी भेट देऊन अमळनेर, पारोळा, धुळे चौफुलीवर नाकाबंदी केली. जिल्ह्यात वायरलेस संदेश पाठवले. या घटनेचे वृत्त कळताच पारोळा कुटीर रुग्णालयात शहरातील नागरिकांनी धाव घेतली. सदर हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांपुढे आरोपीना पडकण्याचे मोठे आव्हान उभे राहीले आहे.

Protected Content