अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्यासाठी रु. १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ इतक्या खर्चाच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकरी भवनाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून परिसरातील हजारो शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही किंवा विद्यमान इमारती जीर्ण अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार या प्रकल्पासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच ७५.१८ लाख रुपये इतके शासन अनुदान दोन समान टप्प्यांत वितरित करण्यात येणार आहे. उर्वरित निधी बाजार समितीने स्वतःच्या स्वनिधीतून किंवा आवश्यक असल्यास कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर मंजूर होणारी रक्कम प्रशासकीय मंजुरीपेक्षा कमी असल्यास त्याच मंजूर निविदा रकमेच्या ५० टक्के इतकेच अनुदान देण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.या शेतकरी भवनाच्या बांधकामापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता (स्थापत्य) यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश दिले जातील. तसेच बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश बाजार समितीला देण्यात आले आहेत.
शासनाने प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण करण्याची अट घातली आहे. तसेच भवनाच्या देखभाल-दुरुस्ती, वीज, पाणी, मनुष्यबळ आणि इतर दैनंदिन खर्चाची जबाबदारी संबंधित बाजार समितीचीच राहणार असून त्यासाठी शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही. या शेतकरी भवनामध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी महिला-पुरुषांसाठी मुक्काम, विश्रांती आणि मूलभूत सुविधांची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. याशिवाय ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भोजन योजना’ अंतर्गत शेतकऱ्यांना केवळ ५ रुपयांत भोजन उपलब्ध करून देण्याची सुविधाही प्रस्तावित करण्यात आली आहे. भोजनासाठी शासनाकडून अनुदान तसेच बाजार समितीचा वाटा दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी पणन मंत्री ना. जयकुमार रावल, खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अमळनेर बाजार समितीला हा लाभ मिळाल्याचे सांगण्यात आले. तसेच सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पाटील आणि संचालक मंडळाने शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या भवनामुळे अमळनेरसह परिसरातील हजारो शेतकरी, हमाल आणि मापाडी यांना मोठा दिलासा मिळणार असून बाजार समितीत येणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.



