पुणे प्रतिनिधी । श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे नुकतेचे राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत १५६ मंडळांनी सहभाग घेतला असून यात 98 मंडळांनी पारितोषिक मिळविली आहेत. पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, या स्पर्धेत पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागातील नाना पेठ येथील काळभैरवनाथ तरुण मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर सिटी पोस्ट चौकातील महाराष्ट्र तरुण मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, गुरुवार पेठेतील वीर शिवराय मित्र मंडळाने चौथे तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी ही घोषणा पत्रकार परिषदेत केली. स्पर्धेत १५६ मंडळांपैकी ९८ मंडळांनी पारितोषिके मिळवली असून ट्रस्टच्या वतीने १२ लाख ६ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हास पवार, अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.