न्यूयॉर्क वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना बद्दल नवीन माहिती प्रसिद्ध केली आहे. करोना या साथीच्या आजाराचं स्वरूप बदलत असून, विषाणूचा प्रसार २०, ३० आणि ४० वर्ष वयोगटातील व्यक्तींकडून वेगानं होत असल्याचं समोर आले आहे.
संसर्ग झालेल्या या वयोगटातील अनेकांना स्वतःला संसर्ग झाल्याची जाणीव होत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या वेस्टर्न पॅसिफिकचे प्रादेशिक संचालक ताकेशी कासाई यांनी म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वेस्टर्न पॅसिफिकचे प्रादेशिक संचालक ताकेशी कासाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला. ते म्हणाले,”हा साथीचा रोग आता स्वरूप बदलत आहे. वयाच्या विशीत, तिशीत आणि चाळीशीत असणाऱ्यांमुळे संसर्ग वाढत आहे.
या वयोगटातील संसर्ग झालेल्यांपैकी अनेकांना आपल्याला संसर्ग झाला आहे याची कल्पनाच नाहीये. त्यामुळेच अशा लोकांच्या माध्यमातून वयोवृद्ध, आधीपासून वेगवेगळ्या व्याधी असणाऱ्या लोकांना संसर्ग होण्याची भीती अधिक वाढली आहे,” असंही ते म्हणाले.