भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील आंबेडकर नगर परिसरातील एका भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरूणीला सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील आंबेडकर नगर परिसरातील एका भागात २० वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रितेश मोरे याच्याशी तरूणीची दोन वर्षांपासून ओळख आहे. दरम्यान, तरूणीचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरले होते. याचा राग आल्याने रितेश मोरे, विशाल निवृत्ता सपकाळे उर्फ चिंक्या आणि पंकज गोविंद सोनवणे सर्व रा. भुसावळ या तिघांनी तरूणीचे लग्न ठरलेल्या कुटुंबात जावून तिची बदनामी केली.
एवढेच नाही तर रितेश मोरे यांच्या सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी तरूणीने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता संशयित आरोपी रितेश मोरे, विशाल निवृत्ती सपकाळे उर्फ चिंक्या आणि पंकज गोविंद सोनवणे सर्व रा. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इकबाल अली सैय्यद करीत आहे.