छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुस्लीम मतपेढी काँग्रेसकडे वळवल्याचे लक्षात येताच अल्पसंख्याक मंत्री अब्दल सत्तार यांनी टोपी फिरवली आहे. ‘लोकसभेला आमच्याकडून मदत होते. मात्र विधानसभेला भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला मदत होत नसल्याने माझ्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. म्हणून त्यांनी रावसाहेब दानवेंचे काम केले नाही,’ असे वक्तव्य राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. शिवसेना शिंदे गटाबरोबर प्रासंगिक करार असल्याचे त्यांनी सांगितले.
रावसाहेब दानवे जालना लोकसभेच्या जागेवर सहाव्यांदा रिंगणात होते. केंद्रात रेल्वे राज्य मंत्रिपद भूषवलेले रावसाहेब दानवे यंदा एक लाख पेक्षा अधिक मतांनी पराभूत झाले. सिल्लोड मतदारसंघ हा अब्दुल सत्तार यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना सिल्लोडमधून मताधिक्य मिळू शकले नाही. त्यावर अब्दुल सत्तर यांनी आपले मत मांडले. आम्हाला विधानसभेत सिल्लोडमध्ये भारतीय जनता पक्षाकडून मदत मिळत नाही. याची नाराजी कार्यकर्त्यांच्या मनात होती. हेच कारण धरून आमच्या काही कार्यकर्त्यांनी यंदा त्यांचे काम केले नसल्याची कबुली सत्तार यांनी दिली.