खेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे विरोधकांतर्फे शिंदे गटावर पन्नास खोके एकदम ओके असा समाचार घेतला जात असतांनाच माजी मंत्री रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार पलटवार करत त्यांनी १०० खोके घेतल्याचा आरोप केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या कोकण दौर्यात शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यांच्या दौर्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील लाभला होता. विशेष करून शिंदे यांच्यासोबत गेलेले गद्दार असून त्यांनी पैशांसाठी ईमान विकल्याचा आरोप त्यांनी केला होता. माजी विरोधी पक्षनेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांना आज खेड येथे बोलतांना उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे शंभर कोटी रुपये घेतले, असा आरोप रामदास कदम यानी केला आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणारे पत्रही दिल्याचे कदम यांनी म्हटले आहे. दरम्यान, शंभर खोके कोठून घ्यायचे हे त्यांना चांगलचं माहिती आहे.आता कोकणात येऊन गद्दार आणि खोक्यांची भाषा करणार्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये. अडीच वर्षात ते कधीही बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री आणि बेटा मंत्री, नेता बाहेर, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.