यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रमजानच्या पवित्र महिन्याची सांगता करणाऱ्या “ईद-उल-फित्र” च्या सणाला यावल शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठन केले. ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मौलाना सैय्यद अब्दुल समी कादरी यांच्या नेतृत्वाखाली यावल तसेच आजूबाजूच्या परिसरातील मुस्लिम समुदायाने प्रार्थना केली.
रमजान हा संयम, सहनशीलता आणि मानवतेचा संदेश देणारा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात मुस्लिम समाजाचे लोक उपवास करतात, गरिबांना दान देतात आणि आध्यात्मिक शुद्धीकरणावर भर देतात. ईदच्या दिवशी सर्वजण नवीन कपडे घालून एकमेकांना गलेमिटून शुभेच्छा देतात.
३० मार्चच्या रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर ईदची घोषणा करण्यात आली. त्यानंतर शहरातील बाजारांमध्ये मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी उतरले. नवीन कपडे, टोप्या, खजूर आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करणाऱ्या लोकांनी बाजारांना गजबजलेले स्वरूप दिले. ईदगाह मैदानावर आकर्षक वस्त्रे परिधान करून आलेल्या लोकांनी सामूहिक नमाज अदा केली. नमाज पूर्ण झाल्यावर सर्वजण एकमेकांना “ईद मुबारक” म्हणत शुभेच्छा देताना दिसले. यावेळी प्रेम, भाईचारा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.