भुसावळात रामनवमी उत्साहात साजरी !

सावदा ता.रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्रीराम नवमीच्या निमित्ताने भाजपा अनु.जाती मोर्चा, सर्व शक्ती सेना आणि अँटी करप्शन मानव अधिकार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रभू श्रीरामांच्या जन्मदिवसाचे महत्त्व अधोरेखित करत सामूहिक पूजन, महाआरती, व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. संजय मोरे यांनी भूषवले. ते अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया, मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन व सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तसेच भाजपा अनु.जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव आहेत. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीराम प्रभू यांच्या पूर्णाकृती प्रतिमेच्या सामूहिक पुष्पहार अर्पणाने करण्यात आली. यानंतर प्रा. मोरे यांच्या हस्ते महाआरती व पूजन पार पडले. उत्सवात नारंगी ध्वजांनी सजलेली मोटरसायकल रॅली मुख्य रस्त्याने काढण्यात आली, ज्यात असंख्य कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

प्रा. संजय मोरे यांनी आपल्या भाषणात श्रीराम जन्माच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी, ई.स. 5114 पूर्व, 10 जानेवारी दुपारी 12:05 वाजता अयोध्या नगरीत झाला होता. राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचे ते जेष्ठ पुत्र होते. त्यांनी वडिलांच्या इच्छेप्रमाणे १४ वर्षांचा वनवास पत्करला आणि आदर्श राजकारण, कर्तव्यनिष्ठा व धर्मशीलतेचा आदर्श घालून दिला.”

कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्पोपहार व शिरा प्रसादाचे वितरण करण्यात आले, ज्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. हा कार्यक्रम अत्यंत भक्तिपूर्ण व अनुशासित वातावरणात पार पडला. प्रशांत जाधव (मानव अधिकार युवक राज्य उपाध्यक्ष), मायाताई मोरे (सर्व शक्ती सेना राज्य उपाध्यक्ष), डॉ. धनराज बावस्कर (जिल्हा उपाध्यक्ष), गजानन कांडेले (युवक उपाध्यक्ष), सचिन सुरवाडे (जिल्हाध्यक्ष), डॉ. संदीप बिसन गाढे (जिल्हाध्यक्ष), मयुर कोळी (युवक जिल्हाध्यक्ष), प्रा. सुनील तायडे, प्रा. अनिल सपकाळे, विकास सावळे, प्रा. योगिता सपकाळे, प्रा. संगीता, प्रा. स्नेहा सोनवणे, रंजना सावळे, संजय कोळी, शशिकांत कोळी, दिपक कोळी, मोहित कोळी, प्रकाश कोळी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content