जळगाव, प्रतिनिधी | शहरात जागतिक शाकाहार दिनानिमित श्री जैन युवा फाउंडेशन, जळगाव तर्फे मंगळवार १ ऑक्टोबर रोजी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित शाकाहार रॅली काढण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पत्रपरिषदेत शाकाहार प्रणेते रतनलालजी बाफना यांनी दिली. याप्रसंगी श्री जैन युवा फौंडेशनचे अध्यक्ष दर्शन टाटीया, सचिव रितेश छोरीया, कोषाध्यक्ष पियूष संघवी, सदस्य प्रवीण छाजेड़, प्रवीण पगारिया,रिकेश गांधी, प्रितेश चौरडिया चंद्रशेखर राका आदी उपस्थित होते.
प्रत्येकाने शुद्ध व सकस शाकाहार घ्यावा. दीर्घायुष्यासाठी शाकाहार महत्वपूर्ण ठरतो. मांसाहार जितके शरीराला घातक आहे त्याहुन अधिक घातक पर्यावरणच्या दृष्टीने आहे. यासाठी प्रचार-प्रसार रॅलीतून करण्यात येणार आहे. त्याबाबतचे संदेश देणारे फलक रॅलीत असतील अशी माहिती श्री. बाफना यांनी दिली. श्री जैन युवा फाउंडेशनचे रॅली काढण्याचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षी शाकाहार या विषयवार चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. तसेच झांकी(ट्रैक्टर वरील देखावा )स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला सकाळी ७.४५ वाजता शिवतीर्थ मैदानातून मान्यवरांच्या
हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात होईल. समारोप महात्मा गांधी उद्यान येथे होईल. त्यानंतर उद्यानात सभा घेतली जाणार आहे. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, तुषार चोथानी हे मार्गदर्शन करतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त उदय टेकाळे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, माजी खासदार ईश्वरलाल जैन, संघपती दलीचंद जैन, उद्योजक अशोक जैन, गो सेवक अजय ललवाणी उपस्थित राहणार आहे.
रॅलीत २५ शाळांचे विद्यार्थी शाकाहार प्रेमी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभाग घेणार आहेत. नागरिकांनी सहपरिवार उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.