नवी दिल्ली-वृत्तसेवा | रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली असून या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली महिला ही केंद्रीय पातळीवरील मंत्रीपदावर आरूढ झाली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. पहिल्या टप्प्यात तर अगदी रक्षाताई खडसे यांना तिकिट मिळणार की नाही ? याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला. पक्षाने उन्मेष पाटील यांचे तिकिट कापले तरी रक्षाताई खडसे यांना लागोपाठ तिसर्यांदा उमेदवारी दिली. तर जळगावातून स्मिताताई वाघ यांना उमेदवारी मिळाली. दोन्ही उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आल्या.
रक्षाताई खडसे यांनी विजयाची हॅटट्रीक केल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. या अनुषंगाने सकाळी दहा वाजेच्या सुमारस त्यांना पंतप्रधान कार्यालयातून मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची तयारी करण्याचे सांगण्यात आले तेव्हाच मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे काही मिनिटांमध्येच राजकीय वर्तुळात ही बातमी पसरली. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांनी चहापानासाठी मंत्रीपदासाठी निश्चीत केलेल्या सहकार्यांनी बोलावले. यात रक्षाताई खडसे यांनी देखील उपस्थिती लावली.
रक्षाताई खडसे या स्वत: दिल्लीत असल्या तरी आ. एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय हे मुक्ताईनगरलाच होते. हे सर्व कुटुंब खासगी विमानाने दुपारीच दिल्ली येथे रवाना झाले.
सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सुरू झाला. पहिल्यांदा पंतप्रधान आणि नंतर ज्येष्ठ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात पहिल्यांदा कॅबिनेट आणि या पाठोपाठ स्वतंत्र प्रभार असणार्या राज्यमंत्र्यांची शपथ घेतली. यानंतर रक्षाताई खडसे यांनी आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.