जळगाव (प्रतिनिधी) अत्यंत संवेदनशील आणि महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्या शेतकरी कर्जमाफिबाबत खा.डॉ.भारती पवार या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असतांना रावेरच्या खासदार रक्षाताई खडसें यांना हसू आवरेनासे झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. विशेष म्हणजे रक्षाताईंचे सासरे एकनाथराव खडसे आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद सर्वश्रुत असल्यामुळे खा.रक्षाताईंनी फडणवीस यांची खिल्ली उडवली, असा तर्क लावला जात आहे.
या संदर्भात अधिक असे की, डॉ.भारती पवार यांनी दि. १६ रोजी लोकसभेत नाशिकमधील कांदा उत्पादकांचा प्रश्न मांडला. यावेळी त्यांनी कांद्याला २ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी केली. यावेळी खासदार पवार यांनी महाराष्ट्रात कमी पाऊस पडल्यामुळे केंद्र सरकारने अधिकच निधी द्यावा,अशी मागणी ही केली. ही मागणी करत असतांना डॉ.पवार यांनी जलशक्ती मंत्रालयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात शेतकर्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानते, असे म्हणताच त्यांच्या अगदी मागे बसलेल्या खासदार रक्षा खडसे यांना हसूच आवरले नाही. त्यांनी अगदी बाकाखाली आपले डोके नेत हसू आवरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रितम मुंडे या देखील खदखदून हसत होत्या. आता हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. एका फेसबुक पेजवर याला अपलोड करण्यात आले असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील मुंडे आणि खडसे परिवार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील मनाला जातो. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी केल्याचा संवाद ऐकताच खा.खडसे आणि मुंडे यांनी जोरदार हसून खिल्ली उडवली का ? असाच तर्क लावला जातोय. अलीकडच्या काळात एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रितीने टिका केली आहे. यामुळे रक्षाताई खडसे यांनीदेखील याच प्रकारे मुख्यमंत्री विरोधी भूमिका घेतली का ? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान, या संदर्भात खा.रक्षाताई यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
पहा : मुख्यमंत्र्यांचे कौतुक केल्यानंतर खासदार रक्षाताईंना अनावर झालेल्या हास्याचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/savemaharashtrafrmBJP/videos/656789238169362/