मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला असतांना सरकार ढिम्म बसल्याचे दिसून येत आहेत. तर, राज्यपाल हे समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत का ? असा प्रश्न आज शिवसेनेने विचारला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनातील आजच्या अग्रलेखात आपत्ती निवारणावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात ठिकठिकाणी महापूर आणि प्रलयाचा हाहाकार माजला आहे. या महापुरात ९०हून अधिक जणांचे बळी गेलेत. त्यातच साथीच्या आजारांनीही डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. अनेक भागत दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिस्थिती दिवसेंदिवस भयंकर होत आहे. पण सरकार म्हणून असलेली दोन डोकी फक्त शाब्दिक आश्वासनांचीच पतंगबाजी करत आहेत. तर मुख्यमंत्री बंद लॅपटॉपवर परिस्थितीचं गांभीर्य समजून घेत असल्याची मजेशीर छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. मुख्यमंत्री अधिकार्याला फोनवरुन सुचना देतानाचे लाईव्ह चित्रिकरण सध्या सुरु आहे. सध्या मुख्यमंत्र्यांची एक तर्हा तर उपमुख्यमंत्र्यांची दुसरी तर्हा सध्या सुरु आहे. सरकार कुठे आहे ? राज्यपाल काय समुद्राच्या लाटा मोजत बसलेत का? असा सवालही या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
यात पुढे म्हटले आहे की, ज्या अर्थी मंत्रीमंडळ विस्ताराला इतका वेळ लागतोय तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही. राज्यपालांनी कोणाच्या आदेशानं बेकायदेशीर सरकारला शपथ दिली? असा सवाल करताना १६ आमदारांच्या संदर्भात अपात्रतेची कारवाई सुरु असताना विधानसभेत मतदान करणं म्हणजे झुंडशाही आहे. न्यायालयावर दबाव आणून कायदा थोडा वाकवण्याचा प्रयत्न होईल, पण घटनेतील १० व्या अनुसुचितील सूचना पायदळी तुडवून सरकार वाचवता येणार नाही अशी टीका यात करण्यात आली आहे.