भुसावळ प्रतिनिधी । शहरात नुकत्याच काढण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे बेघर झालेल्या नागरिकांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. याबाबत रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी भूमिका मांडली.
राजू सुर्यवंशी या पत्रकार परिषदेत म्हणाले की, भुसावळ शहरात नुकत्याच काढण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे सुमारे तीन हजार कुटुंबे रस्त्यावर आलेली आहेत. या शोषीत घटकांना हक्काचे घर मिळावे म्हणून रिपाइंने सातत्याने पाठपुरावा केला आहे. याला आ. एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे आणि नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे आता या तीन हजार कुटुंबांसाठी घरकूल योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री लवकरच भुसावळ येथे येत असून त्यांच्याशी सर्वपक्षीय शिष्टमंडळ याबाबत चर्चा करणार असल्याची माहितीसुध्दा राजू सुर्यवंशी यांनी दिली. या पत्रकार परिषदेला रिपाइंचे ज्येष्ठ नेते रमेश मकासरे, उपनगराध्यक्षा लक्ष्मीताई मकासरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पहा– राजू सुर्यवंशी नेमके काय म्हणाले ते !