कोलकाता वृत्तसंस्था । रियान पराग आणि जोफ्रा आर्चरच्या दमदारी फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा तीन गडी राखून पराभव केला.
घरच्या मैदानावर कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. धवल कुलकर्णीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या वरुण अरॉनने चमकदार कामगिरी केली. त्याने ख्रिस लिन आणि शुभमन गिल यांना लवकर बाद केले. यानंतर नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रेयस गोपाळने नितीश राणाला माघारी धाडत कोलकात्याला धक्का दिला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. दिनेश कार्तिकने मात्र जोरदार फटकेबाजी करून नाबाद ९७ धावा केल्या. यामुळे संघाला १७५ पर्यंत मजल मारता आली. ऑशने थॉमस, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
कोलकात्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. मात्र रहाणेनंतर संजू सॅमसन, बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी ठराविक अंतराने माघारी परतले. अखेरीस रियान परागने जोफ्रा आर्चरच्या साथीने फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. ठराविक अंतराने राजस्थानचे फलंदाज माघारी परतत असताना रियान परागने अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरसोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना पराग ४७ धावांवर हिट विकेट झाला.
मात्र तत्पूर्वी त्याने आपल्या संघाचा विजय निश्चित केला होता कोलकात्याकडून पियुष चावलाने ३, सुनील नरीनने २ तर प्रसिध कृष्णा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी १-१ बळी घेतला.