राजनाथसिंह यांचे वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात; माफीची मागणी

मुंबई प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी यांनी शिक्षण दिल्याचे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केल्याने वाद निर्माण झाले असून त्यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात नीरज चोप्रा याच्या नावाने स्टेडियमचं उद्घाटन पार पाडलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर बोलताना  छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य पुण्यामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं.  

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संत रामदासाची कधीही भेट झालेली नाही. समकालीन इतिहासामध्ये सुद्धा तसा कुठलाही पुरावा नाही, हे हायकोर्टाने सुद्धा मान्य केले आहे. मात्र जाणीवपूर्वक खोडसाळपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व नाकारण्यासाठी गुरु म्हणून रामदास व दादोजी कोंडदेव हे सांगितले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तुत्वावर इतिहास घडवला. आरएसएसच्या तथाकथित इतिहासकारांनी आजपर्यंत खोटे आणि वादग्रस्त इतिहासाचे लेखन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ही फार मोठी गॅंग आहे” राजनाथ सिंग यांनी हा खोटा इतिहास महाराष्ट्रामध्ये सांगुन तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रकार केलेला आहे. खोटा इतिहास आम्ही कधीही मान्य करणार नाही. म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तमाम शिवप्रेमींची तात्काळ माफी मागावी अशी संभाजी ब्रिगेड ची मागणी आहे.

राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निषेध केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे. जर ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते”, असे कोल्हे यांनी सांगितले.

Protected Content