नवी दिल्ली वृत्तसंस्था । पश्चिम बंगालचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर व्हावे असे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने दिले. मात्र राजीव कुमार यांना अटक करण्यात येणार नसल्याचेही बजावले.
गत तीन दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. रविवारी सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी मज्जाव करण्यात आल्यानंतर हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. याबाबत सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. रंजन गोगोई, न्यायमूर्ती गुप्ता आणि न्यायमूर्ती खन्ना यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर याची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात या संवेदनशील विषयावरून सुनावणी घेण्यात आली. तुषार मेहता सॉलिसिटर जनरल यांनी सीबीआयची बाजू मांडली. यामध्ये सीबीआयने पोलीसांनी कॉल रेकॉर्डमध्ये फेरफार करण्याचा आरोप केला. दरम्यान, दोन्ही बाजूंचे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राजीव कुमार यांनी सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश दिले. मात्र त्यांना अटक करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले.
शिलाँग येथील सीबीआयच्या कार्यालयात राजीव कुमार यांनी सुनावणी घेण्यात येईल असे न्यायालयाने निर्देश दिले. तर याच प्रकरणी सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी आता २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.