मुख्यमंत्री फडणवीस करणार अण्णांची मनधरणी

मुंबई प्रतिनिधी । सामोपचाराचे सर्व मार्ग खुंटल्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राळेगणसिध्दी येथे जाणून अण्णांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे वृत्त आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे. कालच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. तथापि, अण्णांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेण्यास साफ नकार दिला. या पार्श्‍वभूमिवर, आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राळेगणसिध्दी येथे जाऊन अण्णा हजारे यांची मनधरणी करणार असल्याचे वृत्त आहे. नियोजित कार्यक्रमानुसार आज फडणवीस हे रामटेकच्या दौर्‍यावर होते. मात्र त्यांनी हा दौरा रद्द करून अण्णांची भेट घेण्याचे ठरविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते दुपारी दोनच्या सुमारास अण्णा हजारे यांना भेटण्याची शक्यता आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरून अण्णा हजारे हे उपोषण मागे घेणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.

Add Comment

Protected Content