मुंबई । आपल्या मातेच्या निधनानंतर फक्त तीन दिवसांचा दुखवटा पाळून राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे हे आपल्या कर्तव्यावर रूजू झाले आहेत.
ना. राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे १ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या पार्थिवावर २ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. साधारणपणे घरातील कोणतीही व्यक्ती मृत झाल्यानंतर किमान १४ दिवसांचा दुखवटा पाळला जातो. तथापि, ना. अंकुश टोपे यांनी तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. यानंतर ते लागलीच आपल्या कर्तव्यावर रूजू झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, मराठवाड्यात सर्वसामान्य घरात मर्तिकानंतर साधारणतः १४ दिवसांचा कठोर दुखवटा पाळण्याची पद्धत आहे. पण आपल्या मतदारसंघातील लोकभावना बाजूला सारून कर्तव्यपूर्ततेसाठी ना. राजेश टोपे यांनी अवघ्या तीन दिवसांचा दुखवटा पाळून पुन्हा कार्यरत होणं हा मराठवाड्यातील जनतेसाठी एक नवा पायंडा आहे. यातून राजेश टोपे यांनी अनेक गोष्टी अधोरेखित केल्या. पुरोगामित्वाचे पुढचे पाऊल तर पडलेच, पण प्रसंगी वैयक्तिक भावनांना अव्हेरून मनावर दगड ठेवून लोकसेवेसाठी कसे समर्पित व्हावे हे सिद्ध केलं. जनतेप्रती असलेली निष्ठा व कर्तव्यदक्षता त्यांनी पुन्हा सिद्ध केली असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
तर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या आपत्तीत जनतेच्या कार्यात रूजू होणे हीच आईला खरी श्रध्दांजली ठरणार असल्याचे नमूद केले आहे.
मातृनिधनाचं दुःख बाजूस सारून आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11 हे पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. दुःख मोठं असलं तरी केवळ तीन दिवसांचाच दुखवटा पाळण्याचा निर्णय टोपे कुटुंबाने घेतला. मी माझ्या कार्यात रुजू होणं हीच मातोश्रींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. pic.twitter.com/KoUqun88lt
— NCP (@NCPspeaks) August 6, 2020