नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच कोणत्याही पक्षाच्या नेत्यांकडून भाषणादरम्यान आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये, यासाठी निवडणूक आयोग नजर ठेवून आहे.
राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह आपल्या एका विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाने कल्याण सिंह यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. सोमवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत कल्याण सिंह यांनी केलेल्या विधानावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी केलेले विधान म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्र पाठवून तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात अलीगडमध्ये कल्याण सिंह म्हणाले होते की, ‘आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहोत. भाजपाचा विजय व्हावा, असे आम्हाला वाटले. देशासाठी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत.’ दरम्यान, या विधानांवरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. या पदावर विराजमान व्यक्तीने कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणे योग्य नाही. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. १९९९ मध्ये त्यांनी भाजपा सोडून जनक्रांती पक्षाची स्थापना केली. मात्र, कालांतरानं त्यांनी जनक्रांती पक्ष भाजपामध्ये विलीन केला. २०१४ मध्ये केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर कल्याण सिंह यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह आता भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे.