औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मला कुणाच्या सणात विष कालवायचे नाही. मात्र ४ मे पासून मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही हनुमान चालीसा म्हणणार असल्याचा इशारा आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. आज औरंगाबाद येथील सभेत महाविकास आघाडीवर सडकून टीका करतांना त्यांनी प्रामुख्याने उध्दव ठाकरे व शरद पवार यांना टार्गेट केले.
राज ठाकरे यांची बहुप्रतिक्षित सभा आज औरंगाबादमध्ये सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर पार पडली. या सभेला अतिशय तुफान असा प्रतिसाद लाभला. तर या सभेत राज यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, तीन तारखेला ईद आहे, त्यांच्या सणामध्ये मला विष कालवायचं नाही. पण ४ मे पासून आम्ही ऐकणार नाही. माझी महाराष्ट्रातील हिंदूंना हात जोडून विनंती आहे की, त्यांनी मशिदींसमोर भोंगा वाजला तर त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा. मला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. मुस्लीम समाजानं हे समजून घेतलं पाहिजे. लाऊडस्पीकर हा समाजीक विषय पण जर तुम्ही त्याला धार्मिक रंग देणार असाल तर त्याला आम्ही धर्मानंच उत्तर देऊ. जर उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? सुप्रीम कोर्टानंही सांगितलंय की यासाठी परवानगी घ्यावी लागते पण आता कोणीही परवानगी घेतलेली नाही. देशातील सर्व लाऊडस्पीकर खाली आले पाहिजेत सर्वांना समान धर्म असला पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.
याप्रसंगी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टिकास्त्र सोडले. राज पुढे म्हणाले की, पवारांना हिंदू या शब्दांचीच ऍलर्जी आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहेच पण ते शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन पुढे गेले आहेत. मी जात मानत नाही मी कोणा ब्राह्मण समाजाची बाजू इथं मांडत नाहीए. मी जात मानत नाही. मात्र पवारांनी राज्यात जातीवाद वाढविल्याचा आरोप त्यांनी केला. पवार यांनी मला प्रबोधनकारांची पुस्तके वाचण्याचा सल्ला देऊ नये. ही सर्व पुस्तके आपण आधीच वाचली असल्याचा टोला त्यांनी मारला. तर पवार हे आधीची छायाचित्रे शेअर करून आपण आस्तीक असल्याचा आव आणत असल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला.