नोटाबंदीमुळे दुकान बंद झाल्यानेच राज ठाकरेंचा जळफळाट – मुख्यमंत्री

17fadnavis4

नाशिक (वृत्तसंस्था) नोटाबंदीमुळे राज ठाकरेंचं दुकान बंद झालं आहे, म्हणून त्यांचा जळफळाट होत आहे. राष्ट्रवादीचीही आता अशीच अवस्था होणार आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत केली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंजिन भाड्याने घेतलं आहे. पण त्यांना हे माहित नाही की तोंडाच्या वाफेने इंजिन चालू शकत नाही. तोंडाच्या वाफेने हे इंजिन चालले असते तर ते आतापर्यंत दिल्लीला गेले असते. पण हे इंजिन गल्लीतच राहिले आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता. आजच्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा रोख थेट राज ठाकरेंवर होता, शिवाय शरद पवार, छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘भुजबळांनी भ्रष्टाचार केला, तिजोऱ्या लुटल्या म्हणून त्यांना तुरुंगात टाकले. त्यांच्यावर लवकरच खटला सुरू होणार आहे. न्यायदेवताच त्यांच्या पापांचा फैसला करणार आहे.’
बालाकोट मध्ये सैनिकांनी केलेल्या कारवाई बद्दल राज ठाकरे यांची टीका म्हणजे सैनिकांच्या शौर्यावर संशय घेण्यासारखे आहे, असा आरोपही त्यांनी केला. देशद्रोह्यांना चाप बसवणारे १२४ अ हे कलम रद्द करायची भाषा काँग्रेस करत आहे, मात्र देश वाचवण्यासाठी आपण मोदींना बळ द्या असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

Add Comment

Protected Content