पाचोरा (गणेश शिंदे) लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, अमळनेर तालुक्यांनी मतदारांनी भरभरून मते टाकत भाजप उमेदवार खा.उन्मेष पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून दिले. त्यामुळे याची परतफेड म्हणून ना.महाजन यांना या भागातील जलसंपदाच्या अपूर्ण प्रकल्पांकडे लक्ष द्यावे,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणूकी नंतर मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या गिरणा पट्ट्याने राष्ट्रवादीकडे पाठ फिरवीत भाजप उमेदवाराला साथ दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या यशात महाजनांना साथ देणाऱ्या गिरणापट्ट्याचा मोठा वाटा आहे. आता या पट्ट्यात अपूर्ण असलेले प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री व जलसंपदामंत्री या नात्याने गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात येत आहे.
या प्रकल्पांबाबत चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी जलसंपदामंत्री यांना पत्र दिले होते. तसेच तापी महामंडळात अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली होती. पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आ.किशोर पाटील यांनी पाठपुरावा केला होता. आता याला चालना देण्यासाठी खा. उन्मेष पाटील, आ.किशोर पाटील, यांना साथ देणे हे जलसंपदा मंत्री महाजन यांच्या हातात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जलसंपदा मंत्री ना.महाजन यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले असून ना.महाजन यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.