जळगाव प्रतिनिधी । यंदा पावसाने राज्यभरात कहर माजवला आहे. रविवारपर्यंत राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी-अधिक असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर दरवर्षी गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार असल्याची चित्र आहे.
पावसाने अगदी कहरच केला आहे. निवडणुकीचा प्रचार व अगदी निवडणुकीच्या दिवसापर्यंत वरुणराजाने सर्वच राजकारण्यांची अगदी गोची केली. राजकारण्यांचे लक्ष प्रचार व निवडणुकीकडे तर सामान्य लोकांचे दिवाळीकडे. पावसाळासुद्धा अगदी आता जून ते सप्टेंबर ऐवजी जुलै ते ऑक्टोबर असतो का असे वाटायला लागले आहे. यावेळी आपल्याला आठवत असेल की जून महिना जवळजवळ कोरडाच गेला होता. त्यानंतर नवरात्रही पावसात गेली व आता अगदी दिवाऴीच्या तोंडावरही पाऊस उभा ठाकला आहे. घराबाहेर पडण्यासाठी पाऊस जराही उसंत देत नसल्याने याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम दिसून येत आहे. या आठवड्याच्या शेवटी वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला सुरुवात होणार असून, या सणावरही पावसाचे सावट जाणवून येत आहे.