रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. म्हसळा येथील सभेत अजित पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे यांचाच असल्याची घोषणा केली. याशिवाय कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देशही दिले. शनिवारी अजित पवार यांनी एकप्रकारे सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळच फोडला. त्यामुळे भाजपाने रायगडच्या जागेवर केलेला दावा, अजित पवार यांनी मोडीत काढला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अदिती तटकरे यांनी तहसील कार्यालयातील इमारत, नगरपंचायत इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
या सभेत रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरेच उमेदवार आहेत, कामाला लागा, असे सांगत अजित पवारांनी रायगड लोकसभेच्या वादावर पूर्णविराम दिला. त्याशिवाय यावेळी अजित पवारांनी मराठा आरक्षणावर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन भरवणार असल्याचेही सांगितले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर योग्य भाष्य करत या आरक्षणासाठी मंत्री मंडळाकडून येत्या 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन भरवणार असून चर्चा झाल्यानंतर बहुमताच्या जोरावर मराठा आरक्षणाबत निर्णय घेतला जाईल असे अजित पवार म्हणाले.
महायुतीचे सरकार सकारात्मकतेने काम करत आहे. मात्र काहींना झटपट निर्णय हवे असतात. अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. मागील आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. घटनेच्या चौकटीत बसूनच देश चालतो. त्यामुळे कोणावरही अन्याय न करता इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आराम देण्यासाठी प्रयत्नशील आहोत असेही अजित पवार म्हणाले. सुनील तटकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या या भूमीत राष्ट्रवादी पक्ष वाढवला. त्यांना कार्यकर्त्यांनी बळ दिले म्हणून आज रायगडमध्ये आपल्या पक्षाची नाळ गावागावांत जोडली गेली आहे, असेही अजित पवार म्हणाले. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष व नगरसेवक अनिकेत पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.