जळगाव प्रतिनिधी । वाळू वाहतुकदाराकडून पंटरच्या मार्फत लाच स्वीकारण्याच्या आरोपातून ट्रॅपमध्ये अडकलेल्या जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली असून यात रोकड व सोन्यासह काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात एका पंटरला सव्वा लाख रूपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली होती. ही लाच प्रांताधिकारी दीपमाला चौरे आणि लिपीक अतुल सानप यांच्यासाठी स्वीकारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने हे दोन्ही जण गोत्यात आले आहेत. दरम्यान, चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर एसीबीच्या पथकाने प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या निवासस्थानाची झाडाझडती घेतली.
प्रांताधिकारी चौरे यांच्या निवासस्थानी अधिकार्यांनी पथकासह छापा टाकला. तेथील तपासणीत पोलिसांना दीड लाख रुपये रोख, सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने, नाशिक येथील फ्लॅटची (अंदाजे मूल्य ४५ लाख) कागदपत्रे, कार आणि दुचाकी वाहन अशी मालमत्ता आढळून आली आहे. यात अन्य कागदपत्रे देखील आढळून आले आहेत. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. तसेच गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया देखील उशीरापर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात आले.