राहुल, प्रियांका आणि केजरीवाल यांनी भडकावल्या दंगली – शहा

amit shaha 1

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. राहुल आणि प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करून दंगली घडवल्या असा गंभीर आरोपही त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले.

 

यावेळी त्यांनी आम आदमी पक्षासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधींवर टीका केली. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनाला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप शहा यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जनतेची दिशाभूल केली आणि दंगली घडवून आणण्याचे काम केले. १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल झाली. समाजातील अनेक लोकांच्या हत्या झाल्या. काँग्रेसच्या सरकारने पीडितांना दिलासा दिला नाही. मोदी सरकारने प्रत्येक पीडित व्यक्तीला पाच-पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिली. जे दोषी होते, त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले, असे शहा यांनी सांगितले.

विरोधकांवर निशाणा
पाकिस्तानमधील ननकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याच्या घटनेवरूनही शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला. केजरीवाल, राहुल आणि सोनिया गांधी यांनी डोळे उघडे ठेवून बघावे. पाकिस्तानने ननकाना साहिबसारख्या पवित्र स्थळावर हल्ला करून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत, असेही शहा म्हणाले. राम जन्मभूमीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी टीका केली. काँग्रेसने राम जन्मभूमीचे प्रकरण खूप वर्षे रखडून ठेवले. त्यांनी कोर्टातही विरोध केला. आता कोर्टानेही निर्णय दिला आहे. देशातील कोट्यवधी लोकांच्या इच्छेनुसार राम जन्मस्थळावर मंदिर उभारले जाईल, असे शहा यांनी सांगितले.

Protected Content