सुरत प्रतिनिधी । मानहानी प्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज सुरत न्यायालयात हजर होणार आहेत. कर्नाटकच्या कोलारमध्ये निवडणुकीतील सभेत त्यांनी ‘सर्व मोदी चोर आहेत’, असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी आहे.
भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केलीय. जुलैच्या सुनावणीत कोर्टाने राहुल गांधी यांना हजर राहण्यापासून सूट दिली होती. तसेच या प्रकरणी सुनावणीची पुढील तारीख १० ऑक्टोबर ठेवली होती. तत्पूर्वी मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एस. एच. कपाडिया यांनी मे महिन्यात गांधी यांना समन्स बजावले होते. मानहानीच्या आणखी एका प्रकरणात राहुल गांधी अहमदाबादमधील एका कोर्टात उद्या ११ ऑक्टोबरला हजर होणार आहेत. त्यांच्याविरोधात अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी खटला दाखल केलाय. राहुल गांधी यांनी या बँकेवर घोटाळ्याचा आरोप केला होता. नोटाबंदीच्या काळात बँकेने जुन्या नोटा देऊन ७५० कोटी रुपयांच्या नव्या नोटा घेतल्या, असे राहुल गांधी म्हणाले होते. या प्रकरणी राहुल गांधींना जुलैमध्ये जामीन मिळाला होता.