राहूल गांधींनी मैदान सोडले – शहा

amit shaha 1

कोल्हापूर प्रतिनिधी । महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असतांना काँग्रेस नेते पळ काढत आहेत. राहूल गांधी यांचे पक्षातील उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे असतांना ते मैदान सोडून बाहेर गेले, असल्याची टीका गृहमंत्री अमित शहा यांनी आज जत येथील जाहीर सभेत केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार सभेचे आयोजन जत येथे करण्यात आले असून कोल्हापूर विमानतळावर थांबल्यानंतर ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. या सभेला जाण्यासाठी ते आज सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास खास विमानाने कोल्हापूर विमानतळावर पोहोचले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि राहुल चिकोडे यांनी शहा यांचे स्वागत केले. यावेळी शहा दहा मिनिटे विमानतळावरील विश्रामकक्षात थांबले. त्यांनी कोल्हापूरसह परिसरातील पक्षीय बलाबल आणि उमेदवारांचा आढावा घेतला. बंडखोरी केलेल्या उमेदवारांसह जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांचीही त्यांनी माहिती घेतली. कोल्हापुरात काँग्रेसकडून अद्याप मोठी प्रचार सभा झाली नसल्याची माहिती मिळताच त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.

गृहमंत्री शहा म्हणाले, ‘लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. त्रिपुरामध्ये आम्ही रस्त्यावर उभे राहून भाजपचे २५० सदस्य बनवले. यानंतर एक हजार लोकांची सभा घेतली. आज त्रिपुरात भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना राहुल गांधी मैदान सोडून बाहेर गेले आहेत. त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेच होते. हा प्रकार विरोधी पक्षासाठी चांगला नाही.’ राज्यातील युतीच्या प्रचाराबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. राज्यात युतीचे २२० हून अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरातील सभेबाबत मात्र त्यांनी साशंकता व्यक्त केली. या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी सभांचे नियोजन असल्याने कोल्हापूरसाठी वेळ मिळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. अखेरच्या दोन दिवसात शक्य झाल्यास कोल्हापूरसाठी सभा घेण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी मंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, अशोक देसाई, विजय जाधव, आदी उपस्थित होते.

Protected Content