लोकसभेत राहूल गांधींची आरएसएस-सावरकर यांच्यावर टीका

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संविधान हे प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि आधुनिक आदर्शांचे मिश्रण असे गौरोवोद्गार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काढले आहेत. संविधान स्वीकारल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते शनिवारी (14 डिसेंबर) बोलत होते. संविधानामध्ये भारताच्या सखोल परंपरांचा देशाच्या मार्गदर्शक दस्तऐवजात समावेश केल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचे आभार मानले. ते या वेळी बोलताना गांधी म्हणाले, “प्राचीन भारताच्या कल्पनांशिवाय राज्यघटना कधीही लिहिली जाऊ शकली नसती. हा आधुनिक भारताचा दस्तऐवज आहे, परंतु त्याची मुळे शिव, गुरु नानक, बुद्ध, कबीर आणि महावीर यांनी दर्शवलेल्या परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहेत.

विनायक दामोदर सावरकर यांच्या लिखाणाचा हवाला देत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. ते म्हणाले, सावरकर यांनी एकदा म्हटले होते की, ‘भारतीय राज्यघटनेची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात भारतीय काहीही नाही. मनुस्मृती हा देशाचा मार्गदर्शक ग्रंथ असावा, असेही सावरकर यांनी म्हटल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. सत्ताधारी पक्ष सावरकरांच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपाच्या राज्यघटनेच्या समर्थनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपाचे खासदार जेव्हा राज्यघटनेच्या रक्षणाबद्दल बोलतात, तेव्हा ते सावरकरांची खिल्ली उडवतात आणि त्यांची बदनामी करतात, असेही ते म्हणाले.

काँग्रेस नेत्याने 2020 च्या हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची दुर्दशा देखील मांडली. अलीकडेच 12 डिसेंबर रोजी पीडितेच्या कुटुंबाला भेट दिल्याचे आठवून गांधी म्हणाले, “आरोपी मुक्तपणे फिरत असताना कुटुंब अजूनही भीतीने जगत आहे. ही परिस्थिती मनुस्मृतीमध्ये आढळणारी मूल्ये प्रतिबिंबित करते, संविधानात नाही. जर भाजप कारवाई करण्यात अयशस्वी ठरला तर इंडिया आघाडी त्यांच्या सुरक्षेसाठी कुटुंबाला स्थलांतरित करेल.

Protected Content