मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांवर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, सरकार शेतकर्यांना स्वावलंबी होण्यासाठी एक एक पाऊल टाकत आहे. त्याच त्यांना दुःख होत आहे. त्या रकमा जुन्या होत्या, मग तुमच्या काळात का नाही माफ केल्या? सरकार तुमचं होतं तेव्हा तुम्ही काय करत होता? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, याप्रसंगी विखे पाटील यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. राज्य सरकार बरखास्त केलं पाहिजे या मागणीसाठी नाना पटोले राज्यपालांना भेटणार आहेत. त्यावर विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाना पटोले अशा घोषणा करत राहतात. त्यांनी कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक घेऊन कार्यकारिणीच बरखास्त केली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच विद्यमान सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले.