अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरी पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे. ३० व ३१ मार्च रोजी होणाऱ्या या संमेलनात अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाकडे विविध मागण्यांचे ठराव मांडले जाणार आहेत.
संमेलनात अहिराणी भाषा मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट करावी, अहिराणी साहित्य प्रकाशित करण्यासाठी शासनाने विशेष अनुदान जाहीर करावे, तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी विषयक अभ्यास केंद्र स्थापन करावे यासारख्या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे. संमेलनाचे उद्घाटन मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाच्या संयोजन समितीने महाराष्ट्रभर प्रचार करून साहित्यप्रेमी, लेखक, कवी व विचारवंतांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
बळीराजा स्मारकापासून प्रारंभ होणार असून यात अहिराणी संस्कृतीचे दर्शन घडवणारे कलाप्रकार, सजवलेले रथ, महिला पथक व साहित्य चळवळीतील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. प्रमुख पाहुणे, पत्रकार आणि रसिकांसाठी प्रशस्त बसण्याची व्यवस्था केली आहे. संमेलन स्थळी स्वतंत्र पार्किंगची सोय उपलब्ध आहे. जायंट्स ग्रुपतर्फे ताक व सामाजिक कार्यकर्ते चिंधू वानखेडे यांच्यातर्फे सरबत वाटप करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या मुख्य संयोजक डॉ. लिलाधर पाटील यांनी सांगितले की, अमळनेर येथे होणारे हे संमेलन अहिराणी भाषेसाठी मैलाचा दगड ठरेल. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला माजी आमदार सदाशिव अण्णा माळी यांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष अशोक पवार यांनी संमेलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी संपूर्ण तयारी केली असल्याचे सांगितले.
संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती सदस्य रामेश्वर भदाणे, चंद्रकांत देसले, प्रेमराज पवार, भारती कोळी, प्रा. पवन पाटील, प्रा. माणिक बागले, प्रा. प्रशांत पाटील, महेश पाटील, वाल्मीक मराठे, रेखा मराठे, सुनंदा चव्हाण, हेमकांत अहिरराव, योगेश पाटील, अजय भामरे, सर्जेराव शिसोदे आदी जवळपास १०० कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. संमेलनाच्या खर्चासाठी संयोजकांनी आर्थिक मदत गोळा करण्यासाठी स्कॅनर कोड लावला असून ज्येष्ठ नागरिक स्वेच्छेने योगदान देत आहेत.
अहिराणी साहित्य संमेलन नगरीच्या परिसरात संमेलनासाठी आर्थिक मदत गोळा करण्यासाठी स्कॅनर कोड लावून संयोजकांतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले असून अनेक ज्येष्ठ नागरिक उस्फूर्तपणे संमेलनाच्या गेटवर लावलेले स्कॅनर स्कॅन करून स्वेच्छेने आर्थिक योगदान देत आहेत.