फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरात गोमातेच्या नावाखाली कायदा हातात घेऊन एका निष्पाप युवकावर अमानुष मारहाण व लूटमार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी कौमी एकता फाउंडेशन, फैजपूर यांच्या वतीने निंभोरा पोलीस स्टेशन येथे अधिकृत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कौमी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष कुर्बान मेंबर यांच्यासह इर्फान भाई (चिनावल), आसिफ बेग (खिरडी), जाविद भाई (खिरडी), हनिफ पहलवान (रसलपूर), जाफर अली आणि हुजेफ खान यांच्या संयुक्त स्वाक्षरीने व उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी फैजपूर येथील रहिवासी जलील साबीर (वय ३४ वर्षे) यांच्यावर काही तरुणांनी कोणतीही खातरजमा न करता गोमातेच्या नावावर संशय घेत बेदम मारहाण केली.

या हल्ल्यादरम्यान आरोपींनी जलील साबीर यांच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत जलील साबीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.



