जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील संत चोखामेळा बोर्डिंग जवळील पेट्रोल पंपासमोर एका ५५ वर्षीय व्यक्तीवर दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून टोकदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास फिर्यादी दिनेश काशीनाथ अहिरे (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे कामानिमित्त जात असताना, आरोपी शेखर मराठे (रा. कासमवाडी, जळगाव) याने त्यांना सार्वजनिक रस्त्यावर अडवले. आरोपीने अहिरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, अहिरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीचा राग अनावर झाला. पैसे मिळत नसल्याचे पाहून आरोपी शेखर मराठे याने फिर्यादींना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. याप्रकरणी दिनेश अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी शेखर मराठे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




