जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते अजय बढे यांनी त्यांची ‘पुस्तक तुला’ केली.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांचा दरवर्षीचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असतो. यंदा त्यांनी वाढदिवसाला पुष्पगुच्छ (बुके) देऊन अभिष्टचिंतन करण्याऐवजी पुस्तक भेट देण्याचे आवाहन केले होते. या अनुषंगाने अजय बढे आणि मित्र परिवाराने यंदा अनोख्या पध्दतीत वाढदिवस साजरा केला. खर तर ते दरवर्षी ताईंच्या वयाइतक्या वजनाचा केक कापत असत. यंदा मात्र त्यांनी पुस्तक तुला करण्याचा निर्णय घेतला.
या अनुषंगाने, आज रोहिणीताई खडसे यांची पुस्तक तुला करण्यात आली. यात अजय बढे यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना व एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करणार्या युवकांना कामात येतील अशा प्रकारची पुस्तके व नोट्स बुक आणून रोहिणीताई यांची लोकनेते नाथाभाऊ समावेत वही तुला केली. आ. एकनाथराव खडसे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत या माध्यमातून गरीब तरूणांना पुस्तके उपलब्ध होतील असा आशवाद व्यक्त केला. तर गरजू तरूणांना पुस्तके मिळावीत यासाठी दहा लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणा नाथाभाऊंनी केली.
या कार्यक्रमाला जळगाव येथील युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष रिकू चौधरी, भरत ससाणे, ललित चौधरी, जितेंद्र जावळे, गणेश कोळी, बाबुभाई पटेल, मुक्ताईनगर शहराध्यक्ष राजू माळी, बबलू सापधरे, प्रदीप साळुंखे आदी उपस्थित होते.