प्लास्टिक वापर-विक्री व साठवणूक करताना आढळल्यास होईल शिक्षा; नगरपरिषदची मोहिम

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वारंवार प्लास्टिक बंदी करून , जनजागृती आणि दंड करूनही अमळनेर शहरात प्लास्टिक वापरणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने अमळनेर नगरपरिषद मार्फत आता प्लास्टिक वापर, विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. अमळनेर नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन अधिनियम व प्लास्टिक कचरा अधिनियम याद्वारे प्लास्टिक बंदी केलेली असून शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिक व वस्तूवर पूर्णपणे प्रतिबंध घातले होते. हे हेरून अमळनेर नगर परिषदेने शहरात प्लास्टिकला प्रतिबंध केले. दुकानात प्लास्टिक वापरणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या दुकानावर नगर परिषदेतर्फे धाड टाकून प्लास्टिक जप्त करीत दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. शहरातील दुकानात मोठ्या प्रमाणात पुन्हा प्लास्टिकचा वापर करण्यात येत असून, प्लास्टिकची विक्री करण्यात येत आहे. आता नगर परिषद प्रशासनाने पुन्हा कारवाईची मोहीम सुरू करावी, अशी गरज आहे.

महाराष्ट्र शासनाने व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम तयार केले आहे. परिणामी १ जुलै २०२२पासून भारत सरकारने अनेक राज्यात प्लास्टिक वापरण्यावर बंदी घातली. अमळनेर नगर परिषदेनेही शहरात प्लास्टिक बंदी केली होती. त्याकरिता शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली. कोणीही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करताना, साठवणूक व विक्री करताना आढळून आल्यास कठोर दंडात्मक कारवाही करण्यात येईल, असा इशारा नगर परिषदेने दिला होता. त्यादृष्टीने भरारी पथक नेमून प्रारंभी कारवायादेखील करण्यात आल्या. मात्र, आता अमळनेर शहरात पुन्हा अनेक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करण्यात येत असून, प्लास्टिकची विक्रीही करण्यात येत आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर व विक्री करणाऱ्या दुकानदारांवर नगर परिषद प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

या प्लास्टिक साहित्यावर बंदी प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक स्टिक इयर बड्स, प्लास्टिक फ्लॅग, प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक कप, प्लास्टिक ग्लास, पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रानपेक्षा कमी), आईस्क्रीम स्टिक, कॉडी स्टिक, थर्माकोल, प्लास्टिकचे इव्हिटेशन कार्ड, फुग्याची प्लास्टिक स्टिक, या प्लास्टिक वस्तू वापरण्यावर व विक्री करण्यावर यापूर्वी अमळनेर नगर परिषदेने बंदी घातली होती.
प्लास्टिक वापरताना किंवा विकताना सापडल्यास किंवा साठवणूक करतांना आढळल्यास पहिली कारवाई ५ हजार रुपये, दुसरी कारवाई १० हजार, तर तिसरी कारवाई २५ हजार दंड व तीन महिने कारावास अशी दंडात्मक कारवाहीची तरतूद यापूर्वी करण्यात आली होती.

आपल्या परिसरात कोणी व्यावसायिक प्लास्टिक वापर विक्री व साठवणूक करताना आढळल्यास त्वरित त्याची माहिती स्वच्छता विभाग, नगरपरिषद अमळनेर कार्यालयास येथे कळविण्यात यावे, असा संदेश नागरिकांना पाठविला आहे. नगर परिषद अधिकारी श्री संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक 9960067316 तसेच श्री किरण खंडारे स्वच्छता निरीक्षक 9371199244 या क्रमांकावर संपर्क साधावा. शहरात दिवसेंदिवस बेवारस जनावरांची संख्या वाढत असून जनावरे दिवसभर मुख्य रस्त्याने फिरत असतात. तर कधी रस्त्यावर ठिय्या मांडून बसतात. ही जनावरे प्लास्टिक खाऊन जीवन जगताना दिसून येत आहेत. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला.

सर्व नागरिक, व्यापारी वर्ग, शाळा, महाविद्यालय, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालय इत्यादी सर्व आस्थापना यांनी मोठ्या प्रमाणात कापडी पिशवीचा वापर करावा तसेच आपल्या घरातील कचरा हा घंटागाडीतच द्यावा कोणीही कचरा बाहेर उघड्यावर किंवा नाला, गटारी मध्ये न टाकता किंवा न जाळता तो घंटागाडीतच द्यावा. तसेच कचरा हा ओला, सुका व घरगुती घातक असा वर्गीकरण करूनच द्यावा. नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखावा व शहर स्वच्छ प्लास्टिक मुक्त करण्यास सहकार्य करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे अमळनेर नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी जाहीर आवाहन केलेले आहे.

Protected Content