नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कृषीमंत्री असलेल्य माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरकारी योजनेअंतर्गत सदनिका लाटल्याच्या आरोपावरून कोकाटे यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, त्यांच्या स्थगिती अर्जावर आज न्यायालयाने सुनावणी करत या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यामुळे कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
१९९५ मध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा निधीतून १०% आरक्षित सदनिका मिळवल्याचा आरोप होता. त्यानंतर, कागदपत्रांत फेरफार करून सदनिका मिळवल्याच्या आरोपावरून माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४७१ आणि ४७ अंतर्गत कोकाटे बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
३० वर्षांनंतर २० फेब्रुवारी रोजी या प्रकरणात निकाल लागून कोकाटे बंधूंना दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना पाच वेगवेगळ्या कलमांअंतर्गत शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या. मात्र, आज न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे कोकाटे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याचा धोका टळला आहे.
माणिकराव कोकाटे सध्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून कार्यरत आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम टळल्याचे मानले जात आहे.