पुन्हा कोल्हापूरात पावसाचा जोर; अलर्ट जारी

71032829

कोल्हापूर वृत्तसंस्था । कोल्हापुरात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या महिन्यात पुरामुळे जिल्ह्यातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. यातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच, पुन्हा पुराचे संकट घोंघावत आहे. धरणे भरली असून, जिल्ह्यातील ६७ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी, कोयनामधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुराची भीती आहे.

जिल्ह्यातील ६७ बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे हे पाच बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे तीन बंधारे देखील पाण्याखाली आहे. कासारी नदीवरील करंजफेण, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ- तिरपण, ठाणे-आवळे व यवलुज हे सहा बंधारे आणि कुंभी नदीवरील शेणवडे, कळे (खा), वेतवडे, मांडुकली, सांगशी व कातळी हे सहा बंधारे, तसेच धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव, कोडोली, चावरे, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, शिगाव, खोची व दानोळी हे नऊ बंधारे, कडवी नदीवरील सवते सावर्डे, शिरगाव, कोपार्डे व बाचणी हे चार बंधारे आणि दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी, कसबा वाळवे, तुरंबे आणि सुळंबी हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. वेदगंगा नदीवरील कुरणी, सुरुपली बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, शेळोशी आणि वाघापूर हे आठ बंधारे, हिरण्यकेशी नदीवरील खंदाळ, ऐनापूर, गिजवणे व निलजी हे चार बंधारे आणि घटप्रभा नदीवरील तारेवाडी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे आणि आडकुर हे चार बंधारे पाण्याखाली आहेत. ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी व हल्लारवाडी असे एकूण ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यातील महत्वाची धरणे ओसंडून वाहत आहेत. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले असून, त्यातून ८५४० क्युसेक्स, कोयनेतून ७०४०४ क्युसेक्स, अलमट्टीमधून १८२००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज सकाळी दहा वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पाणी पातळी ३८.५ फूट इतकी होती. जिल्ह्यातील ६७ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात आजअखेर ८.३६ टीएमसी पाणीसाठा आहे.

Protected Content