‘त्या’ रेशनकार्डचा पंचनामा : मात्र माहिती देण्यास टाळाटाळ

धरणगाव प्रतिनिधी | शहरातील आढळून आलेल्या रेशन कार्डच्या गठ्ठा प्रकरणी तहसील कार्यालयाने पंचनामा करण्यात आल्याचे सांगितले असले तरी याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढीस लागले आहे.

या संदर्भात माहिती अशी की, शहरातील धरणी परिसरात काही दिवसांपूर्वी सुमारे २५ ते ४० शिधापत्रीका अर्थात रेशन कार्ड आढळून आले होते. भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी याबाबत आवाज उचलून या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी स्वत: तहसीलदार नितीन देवरे यांच्याशी चर्चा केली असता कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत असल्याचे चित्र समोर दिसून येत नाही. या संदर्भात आज प्रस्तुत प्रतिनिधीने तहसील कार्यालयात संपर्क साधला असता या प्रकरणाशी संबंधीत पंचनामा करण्यात आल्याचे सांगितले. मात्र त्यांनी या संदर्भात काहीही माहिती देण्यास नकार दिला. यामुळे या गोपनीयतेच्या नावाखाली रेशन कार्डचे प्रकरण दडपण्यात तर येत नाही ना ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

 

Protected Content