Home Cities जळगाव विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासनाच्या ई-पत्रिकेचे प्रकाशन

विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासनाच्या ई-पत्रिकेचे प्रकाशन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासनाच्या ई-पत्रिकेचे प्रकाशन आज, १० मे रोजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अध्यासन प्राध्यापक प्रा. पी. पी. माहुलीकर, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक प्रा. समीर नारखेडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अध्यासनाच्या सल्लागार समितीने घेतलेल्या निर्णयानुसार ही ई-पत्रिका प्रकाशित करण्यात आली आहे.

या ई-पत्रिकेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याची माहिती, अध्यासनाची उद्दिष्ट्ये व सल्लागार समितीची माहिती समाविष्ट आहे. यासोबतच धुळे येथील सीए प्रकाश पाठक यांच्या ‘पंडित दीनदयाळ यांचे एकात्म मानव दर्शन’ या महत्त्वपूर्ण लेखाचाही समावेश या ई-पत्रिकेत करण्यात आला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी २०१८ मध्ये ४४ लाख २६ हजार रुपयांचे अनुदान प्रदान केले आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून पंडित दीनदयाळजींच्या विचारांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. तसेच, त्यांचे विचार आजच्या काळाला आणि तंत्रज्ञानाला अनुसरून कसे उपयोगी ठरतील, यावर संशोधन आणि कार्य केले जाणार आहे. या केंद्राद्वारे विविध शैक्षणिक उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound