जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (कबचौ उमवि) व्यवस्थापन विभागात आता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. व्यवस्थापन विभागातर्फे ‘ॲप्रेंटिसशिप ॲम्बडेड’ बी.कॉम (बँकिंग, फायनान्स, विमा सेवा – बीएसएफआय) या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
हा बी.कॉम (बीएसएफआय) अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन आणि सीआरआयएसपी यांच्यातील सामंजस्य करारानुसार तसेच बीएसएफआय सेक्टर स्कील कौन्सिल यांच्या विद्यमाने चालवला जाणार आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ‘पेड ॲप्रेंटिसशिप’ची संधी उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि मानधन मिळणार आहे.
या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना बँकिंग, फायनान्स आणि विमा क्षेत्रासोबतच मायनॉर (उपविषय) म्हणून इकॉनॉमिक्स (अर्थशास्त्र) किंवा डेटा सायन्स या विषयात रोजगाराच्या संधी मिळू शकतील. बी.कॉम (बीएसएफआय) मध्ये विद्यार्थ्यांना एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आणि तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात लवचिकता असल्याने विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार श्रेयांक संरचनेसह अभ्यासक्रम निवडू शकतील. अभ्यासक्रमाच्या पूर्णत्वाच्या कालावधीनुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदविका किंवा पदवी प्रदान केली जाईल. पहिल्या सहा महिन्यांच्या यशस्वी शिक्षणानंतर ‘अकाउंट असिस्टंट’, एक वर्षानंतर ‘जीएसटी असिस्टंट’, दीड वर्षानंतर ‘विमा सल्लागार’ आणि दोन वर्षांनंतर ‘म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर’ अशी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना प्रदान केली जातील.
हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक मोठे संधीचे दालन ठरणार आहे. या अंतर्गत विविध कौशल्य आधारित आणि बहुविद्याशाखीय विषयांचा समावेश असेल. हा कोर्स विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक क्षमता विकसित करण्यास मदत करेल आणि ‘पेड ॲप्रेंटिसशिप’च्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाचा अनुभव देईल.
या अभ्यासक्रमासाठी आवश्यक माहितीपुस्तिका आणि प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ www.nmu.ac.in वर उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरू झाली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. मधूलिका सोनवणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२५७-२२५७४६३ (प्रा. मधूलिका सोनवणे), दिपक फेरवाणी – ९०७३२७७८४८, अश्विनी मुंदडा – ९०२८८२५२८४ आणि दामिनी पाटील – ७०२०९३८८९८ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन विभागप्रमुख प्रा. रमेश सरदार यांनी केले आहे.