Home Cities जळगाव सैनिकांच्या कुटुंबासाठी प्रशासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम; १३ मे रोजी ‘सैनिक सेवा दिवस’

सैनिकांच्या कुटुंबासाठी प्रशासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम; १३ मे रोजी ‘सैनिक सेवा दिवस’

0
147

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या १३ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील अल्पबचत भवन येथे ‘सैनिक सेवा दिवस’ आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिकांच्या विधवा, त्यांचे पाल्य तसेच सध्या देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना उद्देशून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, जिल्हा प्रशासनाने हा ‘सैनिक सेवा दिवस’ आयोजित केला आहे. पालकमंत्र्यांनी म्हटले होते की, “सैनिकहो, तुम्ही देशाचे संरक्षण करा, आम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ.” याच भूमिकेतून या उपक्रमाद्वारे सैनिकांच्या कुटुंबीयांना त्यांच्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, “या दिवशी उपस्थित कुटुंबीयांना त्यांच्या अडचणी व समस्या प्रशासनाकडे थेट मांडता येतील. यासाठी त्यांनी तीन प्रतींमध्ये स्पष्ट माहिती आणि अडचणी नमूद केलेला अर्ज सादर करणे आवश्यक आहे.”

या अर्जात सैनिक क्रमांक, पद, नाव, पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक यांसारख्या आवश्यक माहितीचा समावेश असावा. कुटुंबीयांनी विहित वेळेत आणि दिलेल्या प्रारूपानुसार अर्ज सादर करावा, असे आवाहन मेजर डॉ. निलेश पाटील यांनी केले आहे. ‘सैनिक सेवा दिवसा’च्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे.


Protected Content

Play sound